मुंबई : महारेरामुळे बांधकाम क्षेत्राच्या कारभाराला शिस्त लागली आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना चाप बसला आहे. येत्या काळात देखील रेरामुळे बांधकाम क्षेत्रातील कारभार अधिक पारदर्शी होईल असा विश्वास बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
बांधकाम क्षेत्र व महारेरा संबंधित सर्वसमावेशक माहिती असणाऱ्या महाराष्ट्र रेरा लॉ अँड प्रॅक्टिस या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला. आयसीआयए व महासेवा यांच्यावतीने हे प्रकाशन मुंबईतील बीकेसी येथे पार पडले.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या तब्बल १०० लेखकांनी या पुस्तकात आपले योगदान देत हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये रेरा संदर्भात एकूण ७५ प्रकरणे आहेत. हे पुस्तक १७०० पानांचे असून रेरा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे. विकासकांनी रेराच्या अखत्यारीत कशाप्रकारे काम करावे. यामध्ये प्रकल्प नोंदणी, मुदतवाढ या संबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे.
विकासकांच्या संघटना, ग्राहकांच्या संघटना, एजंटच्या संघटना या सर्वांना समाविष्ट करून सर्वांना याचा कशाप्रकारे फायदा होईल यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच तक्रार निवारण, अपील याचीही माहिती आहे. तसेच महरेराने आतापर्यंत काढलेल्या सर्व पत्रकांचे देखील विश्लेषण यात करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. असे मत या पुस्तकाचे संपादक व ज्येष्ठ सीए रमेश प्रभू यांनी व्यक्त केले.