मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेला खटला रद्द करावा, अशी मागणी करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोंदविलेल्या मूळ गुन्ह्यातून आरोपमुक्तता केल्यानंतरही भुजबळ बंधुंना विशेष न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव दिलासा देण्यास नकार दिला.फौजदारी दंड संहितेमध्ये (सीआरपीसी) खटला रद्द करण्याची तरतूद नाही, असे तांत्रिक कारण देत न्या. राहुल रोकडे यांनी भुजबळांचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला. महाराष्ट्र सदन बांधकामासंबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात व अन्य काही फ्रकरणांत ईडीने छगन भुजबळ, पंकज, समीर व अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला. गेल्यावर्षी समीर व पंकज यांनी खटला रद्द करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या मागदर्शकतत्त्वंनुसार, मूळ गुन्हा रद्द केल्यानंतर ईडीने पीएमएलएअंतर्गत नोंदविलेला गुन्हा कायम राहू शकत नाही. त्याअनुषंगाने आमच्यावरील खटला रद्द करण्यात यावा, असे पंकज व समीर यांनी अर्जात म्हटले होते. पीएमएलए कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीवर पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यापूर्वी त्याच्यावर एपआयआर दाखल झालेला असणे आवश्यक आहे. त्याशिवाय ईडी कारवाई करू शकत नाही. समीर व पंकज यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला गुन्हा आणि नवी मुंबई येथे निवासी इमारत बांधण्याचे आश्वासन देऊनही ती उभारण्यात न आल्याने गुंतवणुकदारांनी केलेल्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा आधार घेत ईडीने दोघांवर गुन्हा दाखल केला. सप्टेंबर २०२१ मध्ये पंकज व समीर यांची या दोन्ही गुन्ह्यांतून आरोपमुक्तता करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मागदर्शतत्त्वे आखली. त्यामुळे पंकज व समीर यांनी ईडीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज केला. दरम्यान, छगन भुजबळ या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. त्यांनी एसीबी न्यायालयात आरोपमुक्ततेसाठी केलेला अर्ज अदयाप प्रलंबित असल्याने ते विशेष पीएमएलए न्यायालयात दाद मागू शकले नाहीत.
महाराष्ट्र सदन घोटाळा: भुजबळांच्या मुलाला व पुतण्याला विशेष न्यायालयाचा दणका, खटला रद्द करण्याची मागणी फेटाळली
By दीप्ती देशमुख | Published: October 27, 2023 6:25 PM