Join us

VIDEO- स्मितहास्य करत छगन भुजबळ म्हणाले, 'लगेच 'अॅक्टिव्ह' होऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 11:32 AM

डिस्चार्जनंतर छगन भुजबळ राजकारणात सक्रीय होणार ?

मुंबई - विरोधकांवर आक्रमक हल्लाबोल करण्याच्या विशेष शैलीसाठी छगन भुजबळ ओळखले जातात. त्याच्या शाब्दिक हल्ल्यामुळे विरोधकदेखील निरुत्तर व्हायचे. पण, गेली दोन वर्षं त्यांची तोफ धडाडलेली नाही. स्वाभाविकच, जामिनावर बाहेर आलेले भुजबळ राजकारणात पुन्हा कधी सक्रिय होणार, याबद्दल समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे 'लगेच 'अॅक्टिव्ह' न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचं आज भुजबळ यांनी स्मितहास्य करत सांगितलं.

स्वादुपिंडाच्या आजारामुळे केईएम रुग्णालयात आजार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी (10 मे) डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची 4 मे रोजी जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे भुजबळ यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हॉस्पिटलमध्ये 6 दिवस उपचार घेतल्यानंतर भुजबळ आज सांताक्रूझ येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. 

दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ यांनी पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला. ''स्वादुपिंडाच्या आजारावरील उपचार सुरु आहेत. दोन महिन्यात आजार कमी झाला आहे, पण पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे गरज पडली तर पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल. शिवाय, दोन-तीन शस्त्रक्रियादेखील कराव्या लागतील. शिवाय, पूर्वीप्रमाणे लगेचच अॅक्टिव्ह' न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे'', असे भुजबळ यांनी सांगितले. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगवासात होते. 4 मे रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे दहा तास कसून चौकशी केल्यानंतर १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक केली होती आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांवर आधीच आरोपपत्र दाखल केले होतं. या प्रकरणाची चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं ‘ईडी’नं म्हटलं होतं आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती. 

छगन भुजबळांच्या अटकेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. ही अटक म्हणजे भाजपाचं षड़यंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून सातत्याने करण्यात येत होता. दुसरीकडे, भुजबळ सातत्यानं जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना दिलासा मिळत नव्हता. त्यांची प्रकृतीही चांगलीच खालावली होती. पण, प्रकृतीच्या कारणावरून जामीन देण्यासही न्यायालयाने नकार दिला होता.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉंड्रिंग) कलम ४५ अन्वये बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी घटनाबाह्य ठरविली होती. कायद्यातील हा बदल भुजबळांना दिलासा देणारा ठरला असून त्यांच्या जामीनाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. 

10 जूनला पुण्यात करणार भाषण

दरम्यान छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात भाषण करणार आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांचं हे पहिलंच भाषण असणार आहे. सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सुरू आहे. या यात्रेचा शेवट 10 जूनला पुण्यात होणार आहे. छगन भुजबळांच्या भाषणानं या यात्रेचा शेवट करण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे. 

टॅग्स :छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस