Join us

भुजबळांची धाकधूक वाढणार: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ जण माफीचे साक्षीदार? सुनावणी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 1:34 PM

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता.

Chhagan Bhujbal Maharashtra Sadan Scam Case (  Marathi News   ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांना दोन वर्षांची तुरुंगवारी झाली होती, त्याच प्रकरणातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाने मान्य केलं आहे. 

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामासंबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात व अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याप्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. अखेर हा अर्ज मुंबई सेशन्स कोर्टातील विशेष कोर्टाने स्वीकारत सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात छगन भुजबळांचा पाय खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भुजबळांवर कोणते आरोप?

छगन भुजबळ हे  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी भुजबळ यांना दोन वर्षांची जेलवारीदेखील झाली होती.   

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केलेल्या आक्रमक विरोधामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या छगन भुजबळ यांना जुन्या प्रकरणात पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :छगन भुजबळओबीसी आरक्षणराष्ट्रवादी काँग्रेसभ्रष्टाचार