मुंबई- पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले दुसरे उत्तम कृषीमंत्री हे शरद पवार आहेत. कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी गुजरातलाही मदत केली आहे, तशी मदत आताही होत नसेल. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी आहे. काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच कृषी क्षेत्रात योगदान किती मोठं आहे, असं म्हणून कौतुक केलं होतं. आता तेच मोदी शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल करत आहेत. मग तुम्ही काय केलं, तुमच्या काळातच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वात जास्त आत्महत्या आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.
"महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला"; खा. सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, यावेळी बोलताना पीएम मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या १० वर्षात सर्वात जास्त आहेत. तुम्ही शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे आणले. यासाठी शेतकरी आंदोलनाला बसले होते. हे आपलं अपयश आहे, विरोधी पक्षाच्या राज्यात जायचं आणि त्यांच्या आरोप करायचं हे आपलं धोरण आहे. तीन कायदे आंदोलनामुळे पाठिमागे घ्यायला लागले. तुम्ही शेतकऱ्याचं उत्पादन वाढवलं का, असं काहीच केलं नाही, तुम्ही खोट बोलत आहात, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जाऊन बोला योगी सरकारने नेमकं काय केलं. आसाममध्ये जाऊन बोला, तेथील मुख्यमंत्र्यांनी काय केलं.देशातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आहे, असंही राऊत म्हणाले.
"एकनाथ शिंदेंनी शिवसेना शब्द त्यांनी घेऊ नये, स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भांडी घासतात भाजपची. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असू शकत नाही.थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला पण रोज सकाळी उठल्यापासून ते सुरू करत आहेत मोदीं शहाच स्त्रोत्र त्यांनी सुरू केलं आहे, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये एक तरुण नेता उपोषणाला बसला आहे.आपण शब्द देऊन देखील सरकारने तो पाळला नाही. मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही जरांगे पाटलांना दिल्लीत घेऊन का आला नाही.पण यांच्या व्यासपीठावर एकजात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि भ्रष्टाचारात बरबटलेले लोक बसले होते आणि हे भ्रष्टाचार नष्ट करायला निघालेत, असंही राऊत म्हणाले.