मुंबई - महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हटली की सारेच म्हणतात, जिंकून जिंकून जिंकणार कोण? सुनीत जाधवशिवाय आहेच कोण...? सलग चारवेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणा-या सुनीत जाधवसमोर यंदा आपले जेतेपद राखण्याचे जबरदस्त आव्हान आहे. यंदाची स्पर्धा इतकी तगडी आहे की सुनीतला जेतेपदाला फाइव्हस्टार लावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. कारण यंदा सुनीतच्याच तोडीचे असलेले महेंद्र जाधव, अतुल आंब्रे, रेणसू चंद्रन, अक्षय मोगरकर, झुबेर शेख, रोहित शेट्टी आणि सुजन पिळणकर हे दिग्गज खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि क्रीडाप्रेमी कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱया महाराष्ट्र श्री स्पर्धेने येत्या 25 फेब्रूवारीला वांद्रे थरारणार, हे पक्के झाले आहे.
महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी महाराष्ट्र श्री चा मान आणि सन्मान फार वेगळा आहे. वांद्रे पूर्वेच्या शासकीय वसाहतीतील पीडब्ल्यूडी मैदानात रंगणारी ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी ही स्पर्धा खेळाचा दर्जा आणि आयोजनातील कौशल्य उंचावणारी ठरावी, असा आपला मानस असल्याचे आयोजक कृष्णा पारकर यांनी व्यक्त केले. रोख इनाम, आकर्षक चषक तर सारेच देतात. महाराष्ट्र श्री स्पर्धा आमच्यासाठी एक रॉयल स्पर्धा आहे आणि तिचे रॉयल आयोजन आम्ही करणारच, पण विजेत्याला आम्ही रॉयल एनफिल्डचा मानही बहाल करणार आहोत, असेही पारकर म्हणाले. स्पर्धेच्या दिवशीही काही सरप्राइज देण्याचे आपले प्रयत्न सुरू असल्याचेही ते पुढे म्हणाले.
नवा विजेता की सुनीतच बाजी मारणार ?
मुंबई श्री स्पर्धा पाहिल्यावर स्पष्ट जाणवले की यंदा महाराष्ट्र श्रीमध्ये सुद्धा पीळदार युद्ध पेटणार. सलग चार वर्षे सुनीत जाधवला महाराष्ट्र श्री स्पर्धेत कुणीच मागे टाकू शकला नाही. तो सातत्याने प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपले जेतेपद राखतोय. गेल्या चारही वर्षात त्याच्यापुढे अनेक आव्हानं उभी ठाकली, पण तो सारी आव्हानं चिरडत पुढे निघाला. मात्र आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी त्याची गाठ महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर, रेणसू चंद्रनशी पडणार आहे. एवढेच नव्हे तर रोहित शेट्टी, सागर माळी, सागर कातुर्डेसारखे जबरदस्त खेळाडूसुद्धा खेळणार आहेत. यापैकी काही खेळाडू यावेळी त्याच्याच गटात खेळत असल्यामुळे गटातील कामगिरीवरच स्पर्धेचा निकाल निश्चित होऊ शकेल, असे भाकित महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी वर्तवले. त्याचप्रमाणे यंदाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुंबईकरांचे हृदयाचे ठोके चुकवणारी असेल, अशी खात्रीही रोठे यांनी दिली.
मुंबईचा दबदबा कायम राहणार...
स्पर्धेचा विजेता कुणीही होवो, पण स्पर्धेवर दबदबा फक्त आणि फक्त मुंबईचाच राहणार, हे निश्चित आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबईचे 41 खेळाडू निवडण्यात आले आहेत. त्यापैकी 20 खेळाडू मुंबई शहरचे प्रतिनिधीत्व करतील तर 21 खेळाडू मुंबई उपनगरच्या संघातून आपला खेळ दाखवतील. या 41 खेळाडूंपैकी अनेक खेळाडू महाराष्ट्र श्री स्पर्धेत गटविजेते ठरतील, हे कुणीही सांगू शकतो. त्यामुळे स्पर्धेवर मुंबईचेच वर्चस्व राहील. मुंबई श्री स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या संघात संदेश सकपाळ, नितीन शिगवण, तेजस भालेकर, बप्पन दास, प्रतिक पांचाळ, आदित्य झगडे,सुजीत महापात्रा, विशाल धावडे, जगदीश कदम, सुशील मुरकर, रोहन गुरव, अभिषेक खेडेकर, सुधीर लोखंडे, रोहित शेट्टी, सुजन पिळणकर, रसेल दिब्रीटो, सकिंदर सिंग, सचिन कुमार, सचिन डोंगरे,महेश राणे आणि नितीन रूपारेल हे उपनगरमधून खेळतील तर सुनीत जाधव, अतुल आंब्रे, सागर कातुर्डे, ओमकार आंबोवकर, राजेश तारवे, विनायक गोळेकर, आकाश बाणे, जगदीश कदम, उमेश पांचाळ, विघ्नेश पंडित, चिंतन दादरकर, समीर भिल्लारे, सौरभ साळुंखे, सुशांत रांजणकर, सुयश पाटील, अनिकेत पाटील, प्रशांत परब, रोहन धुरी, दीपक तांबीटकर आणि श्रीदीप गावडे हे मुंबईच्या संघातून आपला जोर लावतील.
दहा लाखांची रोख बक्षीसे आणि एनफिल्ड
महाराष्ट्र श्रीला यावेळी गतवर्षी इतकीच रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहे. एकंदर दहा गटात होणाऱया या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल पाच खेळाडूंवर 15,12,10,8 आणि 5 हजार असे एकूण50 हजार रूपयांच्या रोख पुरस्कारांचा पाऊस पडेल. विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह त्यापेक्षा अधिक किमतीची रॉयल एनफिल्डही दिली जाणार आहे. महाराष्ट्र श्री च्या इतिहासात प्रथमच अशी बाईक दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचा उपविजेता 50 हजारांचा तर द्वितीय उपविजेता 25 हजारांचा मानकरी ठरेल. त्याचबरोबर फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुरूष व महिलांच्या गटातही मुख्य स्पर्धेप्रमाणेच गटातील अव्वल खेळाडूंना पुरस्कार दिले जातील.या स्पर्धेची प्राथमिक फेरी 24 फेब्रूवारीला वांद्रे पूर्वेकडील उत्तर भारतीय संघच्या सभागृहात पार पडेल तर 25फेब्रूवारीला डोळे दिपवणारी महाराष्ट्र श्री वांद्य्राच्या शासकीय वसाहतीतील पीडब्ल्यूडीच्या पटांगणात आयोजित केली जाणार आहे.
सारं काही शरीरसौष्ठवावरील प्रेमापोटी- कृष्णा पारकर
शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा मला नेहमीच वाटायचं की आपणही डोले शोले बनवावे. मनापासून व्यायाम करावा. पोझिंगसाठी मंचावर उतरावे. पण मला ते शक्य झालं नाही. मला व्यायामाची खूप आवड होती. मलासुद्धा एक चांगला शरीरसौष्ठवपटू बनायचं होतं, पण परिस्थितीमुळे मला माझ्या आवडीपासून दूर व्हावं लागलं. जरी मी शरीरसौष्ठवपटू बनू शकलो नसलो तरी मला माझे प्रेम स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून सर्वांसमोर व्यक्त करायचं आहे. गेल्यावेळी मी मुंबई श्री घेतली होती. आता माझ्या क्रीडाप्रेमाने मला महाराष्ट्र श्री आयोजित करण्याचं बळ दिलं आहे. आता तर मी शरीरसौष्ठव संघटनेवरही आलोय. त्यामुळे माझे शरीरसौष्ठव खेळावरील प्रेम भविष्यातही असेच बहरत जाईल. महाराष्ट्र श्रीच्या दिमाखदार आयोजनानंतर आता मला शरीरसौष्ठवाचा पुढचा टप्पाही गाठायचा आहे. ते माझ्यासाठी फार मोठे आव्हान आहे आणि मला अशी आव्हानं नेहमीच स्वीकारायला आवडतात. त्यामुळे भविष्यात यापेक्षाही मोठी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, असा आत्मविश्वास कृष्णा पारकर यांनी बोलून दाखविला.