मुंबई - भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदचा फटका मुंबईच्या मेट्रो वाहतुकीला बसला आहे. बंदमुळे घाटकोपर ते एअरपोर्ट स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 15 मिनिटांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एअरपोर्ट ते वर्सोवा स्टेशनची वाहतूक सुरळीत आहे.
मध्य रेल्वे -हार्बर रेल्वे विस्कळीतमध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक आंदोलनामुळे विस्कळीत झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. घाटकोपर येथे धीम्या मार्गावर रेल रोको सुरू आहे. ठाणे स्थानकावर 40 मिनिटं रेल रोको झाल्यामुळे मध्य रेल्वेने ठाणे स्थानकाहून धीम्या लोकल ठाणे ते सीएसटी जलद मार्गावरून सुरू केल्या आहेत.
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोवंडी आणि जुईनगर इथे रेलरोको केल्याने हार्बर रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ ठाणे-नेरूळ लोकलवर दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे ही लोकल स्टेशनमध्ये थांबविली गेली आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या आजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत भीमा कोरेगाव : हिंसाचारात झालेल्या एका मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे, त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.