मुंबई : राज्यातील गृहनिर्माण व विविध क्षेत्रांत कायमस्वरूपी सहकार्यासाठी महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली असून त्याच्या मसुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी आज स्वाक्षरी केली.या वेळी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी-एमएडीसी यांच्या वतीने सिंगापूरमधील कंपन्यांशी करार करण्यात आले. त्यानुसार पीएमआरडीए क्षेत्रात वर्ल्ड क्लास मास्टर-प्लॅनिंगसाठी सुबार्ना जुरांग आणि ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल या सिंगापूरमधील कंपन्या सहकार्य करणार आहेत.सह्याद्री राज्य अतिथीगृहावर झालेल्या संयुक्त समितीच्या बैठकीस अन्न व पुरवठा मंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त लीम क्वॉन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगापूरने छोटा देश असूनही विकासाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. हा विकासच समितीच्या स्थापनेची प्रेरणा आहे. या समितीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग येईल. मुंबईप्रमाणेच राज्यातील अनेक शहरांत विकासाची मोठी क्षमता आहे. पुणे हे त्यापैकी एक शहर आहे. पुण्याचा नागरी क्षेत्रातील विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पीएमआयरडीएद्वारे या शहराच्या विकासाला आकार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा योग्य वेळी संयुक्त समितीच्या प्रयत्नातून पुण्याचे सुनियोजन करता येईल. त्यातून नागरी-नियोजनाचा उत्तम नमुनाही जगासमोर ठेवता येईल. त्यामुळे पुणे विकासाचे ग्रोथ इंजिनही ठरू शकेल.ही संयुक्त समिती यापुढे नागरी पायाभूत सुविधा, विमान सेवा तसेच उद्योग क्षेत्रातील विकास क्षेत्रात काम करणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. तसेच पीएमआरडीएच्यावतीने सुबार्ना जुरांग यांच्याशी करार करण्यात आला. त्याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते यांनी मास्टरप्लॅनबाबत सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली. तसेच ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासाबाबत एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली.
विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र-सिंगापूर समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:11 AM