महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत ४५ नाटकांची मेजवानी, रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 21:05 IST2025-02-15T21:04:10+5:302025-02-15T21:05:49+5:30
१७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत ४५ नाटकांची मेजवानी, रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रसिकांना ४५ नाटके विनामूल्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
१७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता 'पंचमवेद' हे अंतिम फेरीतील पहिल नाटक होईल. यानंतर दररोज सकाळी ११:३० वाजता आणि सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. 'पंचमवेद'सह 'वेटलॅास', 'परफेक्ट मिसमॅच', 'घाट', 'असं कधी होत नाही', 'हमीदाबाईची कोठी', 'वसुधैव कुटुंबकम्', 'मोक्ष', 'मिडीआ', 'वुमन', 'मर्म', 'व्रणिता', 'गंमत असते नात्याची', 'द ब्लॅकन्ड इक्वेशन', 'पाकीट', 'अग्निकाष्ठ', 'संगीत मतीविलय', 'द वल्चर अँड द लिटिल गर्ल', 'बाई मी दागूड फोडते', 'लेबल', 'द हंग्री क्रो', 'चकवा चांदणं', 'घोळमटन', 'हा खेळ पुन्हा खेळू', 'इम्युनिटी - द व्हॅाईस आॅफ टॅालरन्स', 'मून विदाउट स्काय', 'द फिलिंग पॅराडॅाक्स', 'सितारोंसे आगे', 'आवर्तन', 'कडीपत्ता', 'अॅनिमल प्लॅनेट', 'वाघमाऱ्या जानकीराम', 'दानव', 'नेव्हर माईंड', 'लिअरने जगावं की मरावं?', 'नास्ति तृष्णा समो व्याधि:', 'ऐश्वर्या ब्युटी पार्लर', 'ज्योतिर्गमय', 'सेलिब्रिटी', 'ती रात्र', 'इन्शाअल्ला', 'विक्रमाचा घातांक क्ष', 'ओएॅसिस', 'डिनायल' अशी एकूण ४५ नाटके सादर होणार आहेत.
नाटके पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेशिका दादरमधील श्री शिवाजी मंदीर नाट्यगृहात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील २३ केंद्रांसह गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये १२०० हून अधिक हौशी कलाकार कला सादर करणार आहेत.