लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका सुरू असून या आठवड्यातील तिसरी राज्य मंत्रिमंडळ बैठक शनिवारी होत आहे. या आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या आहेत. सोमवारच्या बैठकीत ३३ तर बुधवारच्या बैठकीत २६ निर्णय घेण्यात आले होते.
लोकसभेची आचारसंहिता शनिवारी दुपारी ३ नंतर लागू होणार असल्याने त्यापूर्वी सकाळी ११ वाजता होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीतही अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शनिवारच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असून यात मुंबईसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आठवड्यात शासकीय दस्तावेजावर आईचे नाव लावण्याबरोबर, बीडीडी चाळीला मुद्रांक शुल्क माफी, मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय, अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मराठी भाषा धोरणाला मंजुरी असे लोकप्रिय निर्णय घेतले होते. असेच लोकप्रिय निर्णय या बैठकीत घेतले जाण्याची शक्यता आहे.