मुंबई : राज्यभरात वाढत्या वाहनांबरोबर अपघातांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ३० हजार ८५७ अपघात झाले असून, १३ हजार ५७९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात २ टक्क्यांनी, तर मृत्यूमध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
सद्य:स्थितीला राज्यात साडेतीन कोटींहून अधिक वाहने आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. त्याला काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे, ही कारणे आहेत.
अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.