Join us

तो हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया; संजय राऊत यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 9:52 PM

हे कायद्याचेच राज्य आहे, असे सांगून त्यांनी विरोधकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मा म्हणाले. या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.  

''हे कायद्याचेच राज्य! महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रीया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे,''असे राऊत यांनी म्हटले. त्यांनी शनिवारी ट्विट करून त्यांचे मत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,''विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे, हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला, तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे.''

कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्यानौदलाच्या निवृत्त अधिकारी मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,' असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली. 

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारानौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. 

फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा समाचार"महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही" असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही ट्विट करुन ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एक कथित व्यंगचित्र शेअर केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण झाली. यानंतर मदन यांच्या कन्या शीला शर्मा यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एक मेसेज फॉरवर्ड केल्यानं माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. त्यानंतर काही शिवसैनिकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला, असं शीला यांनी सांगितलं.

टॅग्स :संजय राऊतभारतीय नौदलमुंबईउद्धव ठाकरे