२०१९ मधील चित्रपटांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचेही होणार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 09:34 PM2024-02-17T21:34:04+5:302024-02-17T21:37:22+5:30

५६ वर्षे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय करत होते.

Maharashtra State Marathi Film Awards Ceremony for Films in 2019; Along with the Maharashtra Bhushan Award, the gansamradni Lata Mangeshkar Award will also be distributed | २०१९ मधील चित्रपटांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचेही होणार वितरण

२०१९ मधील चित्रपटांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचेही होणार वितरण

मुंबई - कोरोनामुळे रखडलेल्या २०१९मधील मराठी चित्रपटांचा ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २२ फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. याच सोहळ्यात अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण आणि पं. सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

५६ वर्षे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय करत होते. एप्रिल २०२३पासून हि जबाबदारी फिल्मसिटीकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत आहे. २२ फेब्रुवारीला वरळीतीतील एनएससीआय डोममध्ये हा सोहळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि सह व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

याबाबत 'लोकमत'शी बोलताना अविनाश ढाकणे म्हणाले की, आतापर्यंत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा सांस्कृतिक कार्य संचालनयातर्फे आयोजित केला जायचा, पण हे पुरस्कार चित्रपटांशी संबंधित असल्याने चित्रपट महामंडळाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांचे पुरस्कार द्यायचे राहिले होते. या सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांसह २०१९ वर्षात सेन्सॅार झालेल्या मराठी चित्रपटांचे पुरस्कार देण्यात येतील.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार यंदा अशोक सराफ यांना घोषित झाला आहे. तो देखील या कार्यक्रमात अशोक सराफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पं. सुरेश वाडकर यांना याच कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमाची जबाबदारी नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्याकडे आहे.

हे आहेत अंतिम १० चित्रपट
महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागात तीन सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले जातात. यात प्रथम क्रमांक दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट, द्वितीय क्रमांक बाबूराव पेंटर सर्वोत्कृष्ट चित्रपट, तृतीय क्रमांक मा. विनायक सर्वोत्कृष्ट चित्रपट असे तीन पुरस्कार देण्यात येतात. यात 'पांघरुण', 'ताजमहाल', 'आनंदी गोपाळ', 'वाय', 'बार्डो', 'प्रवास', 'मिस यू मिस्टर', 'बस्ता', 'स्माईल प्लीज' आणि 'बाबा' या १० सिनेमांचा अंतिम चित्रपटांमध्ये समावेश आहे. याखेरीज व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट, दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट हे तीन महत्त्वाचे पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.

चार वर्षांचे पुरस्कार लवकरच...
केवळ २०१९मधील चित्रपटांचेच स्क्रिनिंग झालेले आहे. २०२०, २०२१, २०२२, २०२३मधील चित्रपटांचे स्क्रिनिंग व्हायचे बाकी आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचे पुरस्कार वितरण नंतर होणार आहे. 

एप्रिल २०२०मध्ये अपेक्षित होता...
१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत सेन्सॅार झालेल्या सिनेमांचा हा पुरस्कार सोहळा आहे. हा सोहळा एप्रिल २०२०मध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे तो होऊ शकला नव्हता.

२० तारखेचा मुहूर्त टळला...
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा २० फेब्रुवारीला करण्याची योजना आखण्यात आली होती, पण अधिवेशनामुळे हा कार्यक्रम दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
 

Web Title: Maharashtra State Marathi Film Awards Ceremony for Films in 2019; Along with the Maharashtra Bhushan Award, the gansamradni Lata Mangeshkar Award will also be distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.