महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ; १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार
By संजय घावरे | Published: June 6, 2024 07:16 PM2024-06-06T19:16:13+5:302024-06-06T19:16:35+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
मुंबई - ५८, ५९ आणि ६०व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी अनुक्रमे २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फिल्मसिटी मुंबई डॉट ओआरजी या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. निर्मात्यांनी परिपूर्ण अर्ज भरून महामंडळाकडे विहित मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत. ५८ आणि ५९ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी ज्या निर्मात्यांनी यापूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयात प्रवेशिका सादर केल्या आहेत त्यांनी पुन्हा प्रवेशिका सादर करण्याची आवश्यकता नाही. ज्या निर्मात्यांना अद्याप प्रवेशिका सादर करता आलेल्या नाहीत त्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.