ऑस्कर अध्यक्षांच्या उपस्थितीत रंगणार महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:30 AM2019-05-14T05:30:58+5:302019-05-14T05:35:01+5:30
५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे २६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. आॅस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करून मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्यामार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.
जॉन बेली हे गेली दोन वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील School of cinematic Art येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९७१ ते २०१७ पर्यंत वेगवेगळ्या ७० हून अधिक हॉलिवूड चित्रपटांचे त्यांनी छायाचित्रण केले. तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी दिग्दर्शनही केले आहे.
अमेरिकन सोसायटी आॅफ सिनेमॅटोग्राफरचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. येत्या १९ मे रोजी आयोजित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेली यांचा विशेष गौरव होणार आहे. आॅस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी स्वत: जॉन बेली यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आणि बेली यांनी हे निमंत्रण स्वीकारले, असेही विनोद तावडे यांनी सांगितले.
चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची घेणार भेट
आॅस्करचे अध्यक्ष जॉन बेली २५ व २६ मे असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसांत बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील संबंधितांची, मान्यवरांची भेट घेणार आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. बेली यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटनसुद्धा या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्या व्यवसायाने फिल्म एडिटर असून त्यांनी ३० हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे.