बांग्लादेशात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि इंजिनियर, CM शिंदेंचा परराष्ट्रमंत्र्यांना फोन; काय निर्णय झाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 03:21 PM2024-08-08T15:21:02+5:302024-08-08T15:21:50+5:30
अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली.
CM Eknath Shinde ( Marathi News ) :बांगलादेशात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडल्याने अनागोंदी सुरू आहे. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे बांगलादेशात असलेल्या भारतीयांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असून चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातीलही काही विद्यार्थी आणि कामानिमित्त गेलेले नागरिक तिथं अडकले असून त्यांना मदत करणे आणि मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं आहे.
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही हालचाली करण्यास सुरुवात केली आङे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चेदरम्यान या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी दिली.
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते आणि इतरांना मदत करण्यासह त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, यासाठी विशेष विमानांची… pic.twitter.com/ciBsGRp4Mz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2024
बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थी, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरीत्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं.