...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 06:37 AM2023-05-09T06:37:08+5:302023-05-09T07:05:27+5:30

ओवाळून केले स्वागत

Maharashtra students from Manipur arrived in Mumbai in the evening | ...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

googlenewsNext

मुंबई : एकेक करत घटना आमच्या कानावर यायला सुरुवातच झाली होती आणि अवघ्या काही तासात त्या हिंसक आंदोलनाची धग आमच्या उंबरठ्यावर आली. इंटरनेट, फोन बंद. त्यामुळे संपर्क तरी कसा करायचा, असा प्रश्न पडला होता. घरचे काळजीत होते. इथे आमचे बाकीचे मित्रही सुरक्षित आहेत की नाही हे समजत नव्हते. पण सरकार आमच्यापर्यंत पोहोचले आणि आमची इथून सुटका केली. 

आम्ही गुवाहाटी विमानतळावर सकाळी उतरलो तोपर्यंत आम्ही सुटलो, यावर आमचा विश्वास बसत नव्हता... आणि आता घरी आल्याचा अर्थातच आनंद आहे. मणिपूर येथून सुटका होत मुंबईला पोहोचलेला विकास शर्मा हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

गुवाहाटी विमानतळावरून दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने हे विद्यार्थी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी साडेसात वाजता या विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान मुंबईत दाखल झाले. विशेष विमानाने जेव्हा हे विद्यार्थी मुंबईत दाखल झाले, त्यावेळी विमानतळ परिसरात भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना ओवाळत त्यांच्यावर फुलेही उधळण्यात आली. 

मणिपूर येथील विविध व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रातील २६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी आयआयटी आणि एनआयआयटीमध्येही शिक्षण घेत आहेत. 
तिथे उफाळलेल्या हिंसक आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार घेतला. त्या विद्यार्थ्यांशी संपर्क प्रस्थापित करत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. 

सर्वप्रथम १४ विद्यार्थ्यांशी संपर्क झाल्यानंतर त्यांना मणिपूर येथील शिवसेना कार्यालयात नेण्यात आले. तेथील शिवसेना नेते एम. टोम्बी सिंग यांनी या विद्यार्थ्यांची काळजी घेतली. तसेच त्यांना तेथून सुरक्षित बाहेर काढले आणि सोमवारी त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. तत्पूर्वी, या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गुवाहाटी येथे आणण्यात आले.

गुवाहाटी येथे आल्यावरच या मुलांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद दिसून येत होता तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचा ताणही दूर झाला.

सेल्फी अन् सोशल मीडियावरून आनंद 

मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हे विद्यार्थी सोमवारी सकाळी जेव्हा मणिपूर येथून आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले, तेव्हा त्यांच्या फोनमध्ये त्यांना पुन्हा इंटरनेट सेवा उपलब्ध झाली. 

या विद्यार्थ्यांनी गुवाहाटीला उतरल्यानंतर तिथे सेल्फी काढले, ग्रुप फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद दिसत होता. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिसाद दिला आहे. 

Web Title: Maharashtra students from Manipur arrived in Mumbai in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.