लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा क्रमांक एकवर आला आहे. केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या ताज्या अहवालात याविषयी माहिती देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्रानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परकीय गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असल्याचा कंठशोष करणाऱ्यांना या आकडेवारीने चपराक लगावली आहे. तसेच गुजरातच्या नावाने सातत्याने भाजपला अडचणीत आणू पाहणाऱ्यांनाही हे खणखणीत उत्तर आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी २९ टक्के, कर्नाटकात २४ टक्के, तर गुजरातेत १७ टक्के गुंतवणूक आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र माघारला होता. तो आज पुन्हा अव्वलस्थानी आल्याचे समाधान आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात आमचे सरकार आल्यानंतर उद्योग बाहेर जात असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. जे उद्योग आधीच राज्याबाहेर गेले, तेही आमच्या काळातच बाहेर गेल्याच्या कंड्या पिकविण्यात आल्या, पण आता डीआयपीपीच्या अहवालात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर आल्याने दूध का दूध पानी का पानी झाले आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.