जीएसटी रिटर्न भरण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 02:45 AM2020-02-17T02:45:22+5:302020-02-17T02:45:37+5:30
उपलब्ध आकडेवारीनुसार पात्र बड्या करदात्यांपैकी ९१.३ टक्क्यांनी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या देशातल्या ९२ टक्के बड्या करदात्यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक रिटर्न्स भरले. एक जुलै २०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायांना वार्षिक रिटर्न्स जीएसटीआर -९ अंतर्गत दाखल करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार पात्र बड्या करदात्यांपैकी ९१.३ टक्क्यांनी १२ फेब्रुवारीपूर्वी रिटर्न्स भरले तर ९२.३ पात्र करदात्यांनी १२ फेब्रुवारीपूर्वी सामंजस्य निवेदन दाखल केले. दोन कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांची संख्या देशात १२.४२ लाख आहे. नियमित कर भरणाºया ९२.५८ लाख करदात्यांपैकी ही फक्त १३.४ टक्के आहे. म्हणजेच ८०.१६ लाख करदात्यांना वार्षिक रिटर्न्स भरणे बंधनकारक नाही. दरम्यान, जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत व्यावसायिकांमध्ये सर्वाधिक रिटर्न भरणाऱ्यांची संख्या (९६ टक्के) महाराष्ट्रात आहे. पाठोपाठ गुजरात आणि राजस्थान (प्रत्येकी ९५ टक्के) या राज्यांचा क्रमांक आहे. ज्या व्यावसायिक करदात्यांनी अद्याप याची पूर्तता केली नसेल त्यांना अजूनही रिटर्न भरता येईल, मात्र त्यासाठी त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल, असे स्प्ट करण्यात आले आहे.