प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र ठरला अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:54 AM2021-02-23T00:54:43+5:302021-02-23T06:59:49+5:30
शेतकरी सन्मान योजनेस दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
मुंबई : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्राने देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचा गौरव होणार असल्याचे सांगत कृषिमंत्री दादा भुसे यांनी विभागाचे कौतुक केले आहे.
शेतकरी सन्मान योजनेस दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडक जिल्ह्यांचा सत्कार २४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेंतर्गत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११,६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेसंदर्भात ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. २३ हजार ६३२ तक्रारींचा निपटारा केल्याने राज्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.