महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, फडणवीसांनी आकडेवारी शेअर करत सरकारचे वाभाडेच काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:00 PM2021-12-27T20:00:05+5:302021-12-27T21:02:58+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारचे वाभाडेच काढले.

Maharashtra tops in unemployment, Devendra Fadnavis removes rent from ruling party in assembly | महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, फडणवीसांनी आकडेवारी शेअर करत सरकारचे वाभाडेच काढले

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, फडणवीसांनी आकडेवारी शेअर करत सरकारचे वाभाडेच काढले

Next
ठळक मुद्देआपल्या भाषणात कोरोनापासून ते अमरावती दंगलपर्यंत आणि भ्रष्टाचारापासून ते परीक्षा घोटाळ्यांपर्यंत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडली. त्यामध्ये, विविध मुद्दे त्यांनी मांडत राज्य सरकारला धारेवर धरले. 

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरले. कोरोना कालावधीत झालेला भ्रष्टाचार, सीएम फंडातील निधीचे वाटप, राज्य सरकारकडून पक्षांसाठी देण्यात आलेला निधी, अमरावती दंगल, राज्यातील बेरोजगारी, गुन्हेगारी, परीक्षा घोटाळे यांसह राज्यातील अनेक समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. राज्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचेही त्यांनी अहवालाच्या आकडेवारीवरुन निदर्शनास आणून दिले. 

अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल चढवला. फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यानं केली. फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारचे वाभाडेच काढले. आपल्या भाषणात कोरोनापासून ते अमरावती दंगलपर्यंत आणि भ्रष्टाचारापासून ते परीक्षा घोटाळ्यांपर्यंत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडली. त्यामध्ये, विविध मुद्दे त्यांनी मांडत राज्य सरकारला धारेवर धरले. 

महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त बेरोजगारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पीएलएफएस अहवालाची आकडेवारी शेअर करत महाराष्ट्र राज्याची इतर राज्यांसोबत अशी तुलना यापूर्वी कधीही झाली नव्हती, असेही फडणवीस यांनी म्हटले. अहवालानुसार महाराष्ट्रातील बेरोजगारी दर 22.6 टक्के एवढा असून तेलंगणाचा 15.4 टक्के आहे. 
 
महाराष्ट्र : 22.6 टक्के
झारखंड : 19.8 टक्के
केरळ : 18.9 टक्के
जम्मू-काश्मीर : 17.4 टक्के
ओरिसा : 16.5 टक्के
तेलंगणा : 15.4 टक्के

रझा अकादमीवर आरोप

एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. रझा अकादमीचे लोक रातोरात राज्यात दंगलीचे प्रयोग करतायत मग यावर सरकार काय कारवाई करणार? रझा अकदमीबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे की नाही?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग!

फेक न्युजची फॅक्टरी चालविली गेली. पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले. एक राष्ट्रीय नेता ट्विट करतो आणि कुठलेही नियोजन नसताना 40 हजार लोक रस्त्यावर येतात. हा संयोग असूच शकत नाही. दुसऱ्या दिवशी काही प्रतिक्रिया आली, तर पहिल्या दिवशीची घटना डीलिट आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर कारवाई. जाणीवपूर्वक नाव लिहून भाजपा, अभाविप कार्यकर्त्यांवर कारवाई. रझा अकादमीवर कारवाई करणार आहे की नाही.

राज्यात बदल्यांचं रॅकेट

"आज राज्यात पोलीस दलाची अवस्था जर सुधारली नाही तर देशात सर्वोत्तम मानलं जाणारं महाराष्ट्राचं पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही. माझ्याकडे बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती समोर आली. मी माझ्याकडची माहिती गृहसचिवांना दिली तर काय चुकीचं केलं? उलट मी खूप जबाबदारीनं वागलो. मी ती माहिती माध्यमांना दिली नाही. पण सरकारमधील काहीच लोकांनी माध्यमांकडे माहिती दिली याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. पोलीस जर दोन-तीन कोटी देऊन आज जर पदावर येत असतील ते वसुलीच करणार नाहीत का?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पोलीस दलावर प्रश्नचिन्ह

पोलिस दल सुधारले नाही, तर जगातील सर्वोत्तम पोलिस दलाची बदनामी होईल. माझ्याकडे काही गोपनीय माहिती आली तर जनतेच्या हितासाठी मांडणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. हा अहवाल मी फोडला नाही, तर तो केंद्रीय गृह सचिवांना दिला. मविआ नेत्यांनीच तो अहवाल फोडला. ज्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली, आज त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. खरोखर हा संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी आहे.

महिला अत्याचाराने तर राज्यात सीमा गाठली आहे. जोवर राज्य सरकार लक्ष घालणार नाही, तोवर स्थिती नियंत्रणात येणार नाही. मनोधैर्य योजनेचा बोजवारा उडाला आहे. भीमराव तापकीर यांच्या जागेवर अवैध कब्जा गुंडांनी केला आणि ते तक्रार करायला गेले तर असे आमदार खूप पाहिले, असे उत्तर दिले गेले. आमदारांची ही गत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटेसोबत परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड डॉ. प्रीतीश देशमुख हा ५ लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीला देतो. कुणाकुणासोबत त्याचे फोटो? त्याची ट्विटर टाईमलाईन का डीलिट केली गेली.

Web Title: Maharashtra tops in unemployment, Devendra Fadnavis removes rent from ruling party in assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.