Maharadhtra Unlock: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे आता फक्त अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही होणं बाकी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेतील आणि तसा जीआर लगेच काढला जाईल, अशी महत्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कोविड टास्कफोर्ससोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याच्या मागणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
"राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर कमी असलेल्या अशा २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठविण्याबाबत आज बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. लसीकरणावर जास्तीत भर देऊन आता रुग्णवाढ कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध उठवले जातील तसा निर्णय बैठकीत झाला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अहवाल सादर केलेला आहे. त्यांची आता फक्त सही होणं बाकी आहे आणि एक-दोन दिवसात याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील", असं राजेश टोपे म्हणाले.
मुंबई लोकल अद्याप नाहीचमुंबईची लोकल सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली. यात कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करू द्यावा का? मग त्यासाठीची यंत्रणा आणि तयारी रेल्वेची आहे का? याबाबत रेल्वेबोर्डाशी चर्चा करण्यात येईल. सध्यातरी लोकल संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्यातील ११ जिल्हे अजूनही तिसऱ्याच टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध यापुढेही कायम राहतील पण त्यात काहीशी शिथिलता देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये आता शनिवारी दुकानं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. पण रविवारी सर्व बंद राहील. यासोबत इतर दिवशी दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत. तसंच या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढ दिसून आल्यास स्थानिक पातळीवर निर्बंध आणखी कडक करण्याच्याही सूचना देण्यात येणार आहेत, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.