- अतुल कुलकर्णी मुंबई : भोकर, तुळजापूर, शिरपूर, साक्री वगळता उर्वरित विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे समजते. भोकरमधून आ. अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोल्हापुरातून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, लातूर ग्रामीणमधून आ. अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख तर वांद्रे पूर्वमधून बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव जिशान सिद्दिकी यांच्या उमेदवारीवर केंद्रीय निवड समितीने शिक्कामोर्तब केल्याचे समजते.१०० मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काँग्रेसने निश्चित केली असून पैकी ५० नावांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्टÑवादीमध्ये अजूनही सात ते आठ जागांवरून वाद आहे. अकोला पश्चिम, बाळापूर, गडचिरोली, पुरंदर मतदारसंघासाठी राष्टÑवादी आग्रही आहे. पुरंदरच्या बदल्यात मावळ घ्या, असा प्रस्तावही राष्टÑवादीने ठेवला. बीड जिल्ह्यातील परळी व केजपैकी एक मतदारसंघ द्या, अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसला फक्त आष्टीवर समाधान मानावे लागणार आहे. साक्रीचे आ. डी.एस. अहिरे व शिरपूरचे आ. काशिराम पावरा या अमरीश पटेल समर्थकांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. जर पटेल भाजपमध्ये गेले तर या दोघांचेही पत्ते कट होतील. तुळजापूर येथे विद्यमान आ. मधुकरराव चव्हाण यांना वयामुळे उमेदवारी न देता तरुण चेहरा देण्याचेही बैठकीत सांगण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेडचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राष्टÑवादीला कर्जत-जामखेड हवे आहे तर काँग्रेसला त्या बदल्यात श्रीगोंदा. शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन जागा काँग्रेस लढवणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना शिर्डीमधून लढण्याचा आग्रह असताना त्यांनी त्यास नकार दिला आहे. मुंबईतील कलिना मतदारसंघ राष्टÑवादीला हवा आहे. त्या जागी ते मुंबई राष्टÑवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या भावाला उभे करणार आहेत. मुंबईतून वर्षा गायकवाड यांचेही नाव अंतिम झाले असून संजय निरुपम यांनाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. मात्र निरुपम यांनी त्यास नकार दिल्याचे समजते. प. महाराष्टÑात मावळ आणि पुरंदर वगळता सगळ्या जागा निश्चित झाल्या. विदर्भ आणि मराठवाड्यात काही जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही.>भाजप-सेना युती झाली तर..?भाजप-शिवसेनेची युती झाली तर त्यांच्याकडे अनेक इच्छुकांना तिकिटे मिळणार नाहीत. त्यामुळे युतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता असून अशा बंडखोरांना उमेदवारी देण्याबाबत त्या-त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचे १00 उमेदवार निश्चित; अशोक चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी
By अतुल कुलकर्णी | Published: September 21, 2019 6:39 AM