मुंबई : काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केलीय आम्ही हा खेळ संपवू असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’, असा नारा राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित पवार यांनी दिला.राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी ती जागा निवडून आणत आली आहे. सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहेत. ते जागा लढणार नसतील तर आम्ही ती जागा लढवू. लवकरच उमेदवाराची घोषणा करू असेही पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यांना लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ उमेदवार समजतो. कोणीही असू दे राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही त्याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार. सुप्रिया सुळे यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर मित्रपक्षांशी चर्चा करणार कारण आधीच वरळीची जागा त्यांनी मागितली आहे, असेही पवार म्हणाले.
Vidhan sabha 2019 : अब की बार आघाडी १७५ पार, अजित पवार यांचा नवा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 5:05 AM