Join us

Vidhan Sabha 2019: आदित्य ठाकरे वरळीतून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 4:26 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून लढणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार असून, त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसे सुतोवाच त्यांनी रविवारी रात्री एका कार्यक्रमात केले आहे.आदित्य ठाकरेविधानसभा निवडणूक लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, मतदारसंघाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असतानाच रविवारी एका कार्यक्रमात बोलताना आदित्य यांनी वरळीचा विकास पाहण्यासाठी जगभरातील लोक येतील, असे सूचक विधान केले. याचाच अर्थ, ते वरळी मतदारसंघातून लढणार हे नक्की झाले आहे.माहिम हा वरळीप्रमाणेच शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेना भवन या मतदारसंघात येते, पण तेथे लढण्याऐवजी आदित्य यांनी वरळीला पसंती दिली आहे. सध्या वरळीत शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. त्यांना शिवसेनेकडून अन्यत्र सामावून घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. माहिमची जागा २०१४ मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी जिंकली होती. मात्र, २००९ मध्ये तेथे मनसेचे नितीन सरदेसाई विजयी झाले होते आणि शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मतदारसंघात राहतात. आदित्य माहिममधून लढले आणि मनसेने उद्या निवडणूक रिंगणात उडी घेतली, तर आदित्य-राज आमनेसामने येतील. आदित्य यांना ते टाळायचे असल्यानेही त्यांनी वरळीला पसंती दिल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेशिवसेनावरली