Join us

Vidhan Sabha 2019: मुंबईत जागावाटपासाठी युतीत रस्सीखेच; आयारामांसाठी मित्रपक्षाच्या जागांवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:57 AM

काही ठिकाणी मित्रपक्षांचा आमदार असूनही जागा सोडण्याचा हट्ट कायम

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपास घटस्थापनेचा मुहूर्त ठरला असली, तरी मुंबईतील जागांवरून अद्याप रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी आयातांना सामावून घेण्यासाठी एकमेकांच्या जागांवर दावेदारी सुरू केली आहे, काही ठिकाणी मित्रपक्षांचा आमदार असूनही जागा सोडण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.मागील विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढवल्या. यात मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १५ जागांवर भाजप, त्या पाठोपाठ १४ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएम आणि समाजवादी पार्टीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. यंदा आघाडीने जागावाटपात बाजी मारली आहे. युतीचे जागावाटप अद्याप गुलदस्त्यात आहे. ज्याचा उमेदवार त्याची जागा असे सूत्र सुरुवातीला नक्की करण्यात आले, तर उरलेल्या सात जागांवर दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाचा दावा मान्य करण्यात आला. मात्र, आयारामांना सामावून घेण्यासह त्या-त्या भागातील पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपकडून एकमेकांच्या जागांवर हक्क सांगितला जात आहे. युतीच्या जागावाटपात वडाळा मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे होता. मात्र, कालिदास कोळंबकर काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर भाजप या जागेसाठी आग्रही आहे. मात्र, स्थानिक शिवसेना नेत्यांनी कोळंबकरांना विरोध करत, जागा आपल्याकडेच ठेवण्याची आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे, विद्यमान आमदार भाजपमध्ये दाखल झाले व २०१४च्या निवडणुकीत येथील भाजप उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते घेतल्याचे सांगत भाजपने या जागेसाठी आग्रह धरला आहे. गोरेगावमधून सुभाष देसार्इंचा पराभव करत भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या. देसाई निवडणूक रिंगणात उतरणार का, याबाबत अनिश्चितता असली, तरी शिवसेनेचा या जागेसाठी आग्रह आहे. मागाठाणे येथे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. पालिका निवडणुकीतही शिवसेनेने येथे चमकदार कामगिरी केली, तरी या जागेचा भाजपकडून आग्रह धरला जात आहे.याशिवाय, भायखळ्याची एमआयएमचा आमदार असलेली जागा सोडावी, यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला आहे. याला उत्तर म्हणून भाजपने शिवडीची जागा मागायला सुरुवात केली, तसेच वरळीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चाचपणी करत असल्याचे वृत्त असतानाही याही जागेची मागणी भाजपने केली होती. माहिममध्ये तर भाजपने ठरवून आपले नेटवर्क उभे केले. शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्याची भाजपची इच्छा लपून राहिली नाही, तर शिवसेना भवनची जागा सोडण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. याशिवाय कुलाबा, अंधेरी पश्चिम या भाजपच्या जागा शिवसेनेने मागितल्या होत्या.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस