Join us

Vidhan Sabha 2019: '288 जागांचं वाटप म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर काम'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:21 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आयारामांना तिकीट वाटपात कसं सामावून घेणार हा मोठा प्रश्न युतीसमोर आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही राज्यात प्रचारात आघाडी घेतलेल्या शिवसेना-भाजपा युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते शिवसेना-भाजपात आल्याने जागावाटपाबाबत चर्चेचं गुऱ्हाळ अद्याप सुरुच आहे. त्यामुळे 288 मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा शिवसेना-भाजपा युतीसाठी मुख्य समस्या आहे. 

अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मजेशीर विधान केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 288 जागा आहेत. यातील जागावाटपाचा पेच भारत-पाकिस्तान विभाजनापेक्षाही मोठा आहे. जर आम्ही सरकारऐवजी विरोधी पक्षात असतो तर आज चित्र काहीतरी वेगळे असतं असं सांगत संजय राऊतांनी एकप्रकारे जागावाटपाच्या चर्चेवर निशाणा साधला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आयारामांना तिकीट वाटपात कसं सामावून घेणार हा मोठा प्रश्न युतीसमोर आहे. त्यामुळे जागावाटपाचा पेच सोडविण्यासाठी युतीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे. युतीमध्ये लहान भावाची भूमिका स्वीकारत कमी जागांवर समाधान मानताना शिवसेना राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या शिवसेनेचे दहा मंत्री असून, किमान 13 ते 14 मंत्रिपदे आपल्या वाट्याला यावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आल्याची माहिती आहे. सध्या युतीसाठी भाजपा आणि शिवसेनेकडून काही जागांसाठी वाद आहे. त्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील सहा, विदर्भातील तीन आणि तीन जागांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

भाजपने शिवसेनेला १२२ ते १२३ जागा देण्याची तयारी दर्शवल्याचेही समजते. मात्र, १२६ पर्यंत जागा व मंत्रिपदे वाढवून द्यावीत, यासाठी शिवसेना आग्रही आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबत सोमवारीही चर्चा झाली. केंद्रातील वाटा वाढवून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मोदी मंत्रिमंडळात सध्या अरविंद सावंत हे शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजपने अद्याप होकार दिलेला नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २६ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने त्या दिवशी युतीची घोषणा होईल, असे म्हटले जात होते. आता शहा यांचा दौरा रद्द झाला आहे. युतीचा फैसला दिल्लीत होईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जातील, असेही म्हटले जात आहे. 

महत्वाच्या बातम्या

भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर?; पंतप्रधान मोदींनी मानले ट्विटवरुन आभार

'या' 12 जागांसाठी युतीची लढाई, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आग्रही

'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भारतपाकिस्तान