- खलील गिरकरमुंबई : वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान आहे. आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.वांद्रे पूर्व या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी इच्छुक होते. मात्र, त्यांना बाजूला सारत सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान सिद्दीकी यांच्यासमोर उभे ठाकले आहे. या मतदारसंघातील प्रमुख दावेदार केंद्रीय हज समितीचे सदस्य हाजी इब्राहिम शेख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत वेगळा पर्याय स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सिद्दीकी यांच्यासमोरील आव्हानांत वाढ झाली आहे.लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांचा विजय झाला होता. मात्र, त्यांना केवळ वांद्रे पूर्व मतदारसंघात १,२७६ मतांनी पिछाडीवर राहावे लागले होते. काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांत चुरस होती. सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने इब्राहिम शेख यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला.दुस-या पक्षातून किंवा अपक्ष लढण्याचे संकेतबाबा सिद्दीकी वांद्रे पश्चिम येथील माजी आमदार असल्याने, त्यांच्या मुलाला त्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत विचार करण्याची गरज होती. मात्र, त्यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी दिल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अन्याय झाला आहे. पक्ष अशा कार्यकर्त्यांचा विचार करत आहे. पक्षाची ही चूक आहे. आमच्यासोबत अन्याय झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सांगत शेख यांनी सिद्दीकी यांना असहकार्य करण्याचे व प्रसंगी दुस-या पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:26 AM