युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:30 AM2019-10-03T06:30:49+5:302019-10-03T06:31:30+5:30

बंडाळी होऊ नये म्हणून पत्रक काढून युतीची घोषणा केली असली, तरी जसजशी उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जागावाटप स्पष्ट झाले, तसे शिवसेना-भाजपतील बंडाळीला तोंड फुटले आहे.

Maharashtra Vidhan sabha 2019: the BJP-Sena rebel applications against each other | युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

Next

 मुंबई : बंडाळी होऊ नये म्हणून पत्रक काढून युतीची घोषणा केली असली, तरी जसजशी उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जागावाटप स्पष्ट झाले, तसे शिवसेना-भाजपतील बंडाळीला तोंड फुटले आहे. बैठका, इशारे, रास्ता रोको, राजीनामे अशा मार्गांनी दोन्हीपक्षांनी परस्परांच्या उमेदवारांविरोधात शड्डू ठोकले आहेत.
बहुतांश बंडखोर गुरूवारी आणि शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. छाननीनंतर त्यातील काही रिंगणात उरले, तर ७ तारखेला माघारीपर्यंत त्यांची समजूत काढण्याचे काम दोन्ही पक्षांतील नेत्यांना करावे लागेल, अशी स्थिती ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात आहे. त्यानंतरच लढतीचे आणि रिंगणातील बंडखोरांचे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही ठाणे, पालघरमधील काही मतदारसंघातील नाराजी समोर आली असली, तरी जागावाटपाबद्दलची नाराजी, आयारामांना दिलेली संधी आणि ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्याबद्दलच्या नाराजीने युतीतील संघर्ष टीपेला गेला आहे.

पालघरमध्येही नाराजी
बोईसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरु वारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. विक्र मगड मतदारसंघात भाजपचे विष्णू सवरा यांच्याविरोधात मागील निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झालेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी
गटनेता आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

नवी मुंबईतील शिवसैनिक आक्रमक 
ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्याने नाराज शिवसैनिकांनी दोन्ही मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयात झाली. तेथे संतप्त कार्यकर्त्यांनी कोपरखैरणेकडे जाणारा रस्ता रोखला. बंडखोरी करून ऐरोली व बेलापूरमधून शिवसेनेचा उमेदवार उभा करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. नंतर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यासाठी मातोश्रीवर गेले. नवी मुंबईत मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मिळावी, अशीही मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी सांगितले, शहरात शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत दोन्ही मतदारसंघातून शिवसेना पदाधिकारी निवडणूक लढतील.

कल्याण पश्चिमेत पवार, तर भाईंदरमध्ये जैन आक्रमक
ठाणे : भाजपने उमेदवारी नाकारल्याने कल्याण पश्चिममध्ये भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय गेतला आहे. ते गुरूवारी अर्ज भरणार आहेत. मीरा-भार्इंदरमधील भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात माजी महापौर गीता जैन यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालवली आहे. जैन रिंगणात उतरल्यास मतदारसंघाचे समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार असला तरी, युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आला. शिवसेनेने येथून विश्वनाथ भोईर यांची उमेदवारी निश्चित केली. पवार रिंगणात राहिले, तर ती शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मीरा-भार्इंदरमधील आमदार मेहता मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जातात. गीता जैन यांची या मतदारसंघासाठी प्रबळ दावेदारी होती. मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.

पनवेलमध्ये सेनेचे पाटील रिंगणात
पनवेल : उरण मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरूद्ध भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरल्याने पनवेल मतदारसंघातून शिवसेनेचे बबन पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खारघर येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांनी ही माहिती दिली. उद्या, ३ आॅक्टोबरला पाटील अर्ज भरतील.

पेणमध्येही सेनेचे प्रत्त्युत्तर
अलिबाग : उरणमध्ये भाजपचे महेश बालदी यांनी बंड केल्याने शिवसेनेने पेण मतदारसंघात भाजपचे उमेदवार, माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्याविरोधात नरेश गावंड यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला उत्तर म्हणून अलिबाग विधानसभेत भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते अर्ज भरणार आहेत. श्रीवर्धनमध्ये सेना उमेदवाराविरोधात कृष्णा कोबनाक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात युतीविरोधातच युती असे चित्र सध्या आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: the BJP-Sena rebel applications against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.