चेंबूर विधानसभा : शिवसेना आणि काँग्रेसने केले उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:23 AM2019-10-01T03:23:01+5:302019-10-01T03:23:32+5:30
चेंबूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मुंबई : चेंबूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार चंद्रकांत हंडोरे तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर निवडणूक लढविणार आहेत. या दोन आजी माजी आमदारांमध्ये थेट लढत होत आहे, परंतु या लढतीमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरीचे आव्हान असणार आहे.
माजी आमदार चंद्रकांत हंडोरे या मतदार संघातून दोन वेळा विजयी झाले होते, तर २०१४ला त्यांचा पराभव झाला. त्यांना दोनदा संधी दिली, आता आम्हाला संधी देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षाकडे केली होती, परंतु हंडोरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे दोघे नाराज आहेत. तर विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या समोरही बंडखोरीचे आव्हान आहे. बेस्ट समितीचे अध्यक्ष असलेले अनिल पाटणकर आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे हे इच्छुक होते. इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली होती. त्यासाठी एक दोन वर्षांपासून समाजमाध्यमांवरही केलेल्या कामाची माहिती मांडण्यात येत होती. त्यामुळे पक्षाकडून यंदा तरी आपल्याला संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने जुन्याच शिलेदारांवर
विश्वास दाखविल्यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे.