Join us

Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 5:19 AM

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटकपक्षांसाठी दिलेला ३८ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटकपक्षांसाठी दिलेला ३८ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. घटकपक्षांनी ५५ ते ६० जागांची मागणी केली असून लवकरच या जागांची एकत्रित यादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली. काँग्रेस राष्ट्रवादीचा ३८ जागांचा प्रस्ताव यात फेटाळण्यात आला. ५५ ते ६० जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार आहेत. याबाबत राजू शेट्टी यांच्याकडे घटक पक्षांनी नेतृत्व सोपविले आहे. याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, सर्व छोट्या पक्षांची बैठक झाली. उद्या याबाबत आम्ही एकत्रित यादी तयार करणार आहोत. स्वाभिमानी, शेकाप, लोकभारती, बहुजन विकास आघाडी, डावे पक्ष, बसपा, सपा अशा विविध पक्षांकडून विधानसभा मतदारसंघाच्या नावासह एकत्रित यादी पाठविण्यात येणार आहे. प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडूसुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती शेट्टी यांनी दिली.शेट्टी स्वत: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर मी विधानसभा लढवावी अशी घटकपक्षातील विविध नेत्यांची भूमिका आहे. मात्र, यावर मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून इतरांच्या मतदारसंघात घुसखोरी केल्यास त्यांच्याविरोधात नक्की निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :राजू शेट्टीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस