मुंबई : पुढच्या पाच वर्षांत असा विकास करू की, वरळीतील विकास पाहायला जगातील नेते येतील, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला. वरळी येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातील आदित्य यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे.वरळी येथील एमडीजी वाटुमल महाविद्यालयाच्या सभागृहातील मेळाव्यास ते संबोधित करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अहिर यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना विधानसभा उमेदवारीची घोषणा करण्याचे आवाहन केले. चर्चा तर सुरूच आहे, आज तुम्ही पेपर फोडा. तुम्ही फक्त अर्ज दाखल करा आणि महाराष्ट्रातील प्रचारासाठी जा. वरळीतील विजयाचे प्रमाणपत्र आम्हीच मातोश्रीवर घेऊन येऊ, असे अहिर म्हणाले. यावर, पेपर तपासणी सुरू आहे. याबाबतचा निकाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच जाहीर करतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने वरळीकरांना एक आश्वासन मात्र देतो की, पाच वर्षांत असे काम करू की इथला विकास पाहायला जगातले नेते येतील. या वेळी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, स्थानिक आमदार सुनील शिंदे, नगरसेवक किशोरी पेडणेकर, समाधान सरवणकर, अमेय घोले, आशिष चेंबूरकर आदी नेते उपस्थित होते.
Vidhan Sabha 2019: अखेर मतदारसंघ ठरला; खुद्द आदित्य ठाकरेंनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:49 AM