Vidhan Sabha 2019 : 'काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम मोदी आणि शहांनी केले'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 01:31 PM2019-09-22T13:31:11+5:302019-09-22T13:53:50+5:30
कलम 370 हटवून काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत.
मुंबई - कलम 370 हटवून काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (22 सप्टेंबर) मुंबईत काढले आहेत. गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. काश्मीरचे 1947 मध्ये विलिनीकरण झाले, मात्र कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मोदी आणि मुरली मनोहर जोशी यांनी तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलन केले होते. अखेर कलम 370 रद्द करण्याचे काम मोदी आणि अमित शहा यांनी रद्द करून दाखवलं आहे. तसेच 15 ऑगस्टला श्रीनगर, जम्मू, लडाखमध्येही तिरंगा झेंडा फडकला. काश्मीरमध्ये तिरंग्याची आन, बान, शान मिळवून देण्याचे काम मोदी आणि अमित शहांनी केलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत https://t.co/zCbNNqjoaG
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2019
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी भाजपा आणि शिवसेना युतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे स्पष्ट संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे कलम 370 च्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले. ''महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि विधानभा निवडणूक झाल्याने पुन्हा एकदा राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,'' असा उल्लेख अमित शहा यांनी केला. त्यामुळे राज्यात युती होवो अगर न होवे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याचा हाती राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
अमित शहा म्हणाले की, ''काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जिंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहे. काहीही झाले तरी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राल एनडीएला तीन चतुर्थांश बहुमत मिळेल.''