मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप केला आहे की, ‘पवारांनी तोडफोडीचे राजकारण केले. त्याची फळे ते भोगत आहेत.’ अर्थात तोडफोडीच्या राजकारणामुळेच सध्या अनेक पक्ष तरारत आहेत हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माणसे तोडून फोडूनच घ्यावी लागतात, हा आजवरचा इतिहास आहे. विचारांच्या पायऱ्या आता ढिल्या पडत आहेत, पण हे सर्व केले तरी लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. ते खरेच सुटले असतील तर विधानसभा निवडणुकीत युतीला 250 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
तसेच राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते आणि मग इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल असे सध्या वातावरण आहे. गुंतवणूक, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेले असे प्रमाणपत्र अमित शहा यांनी दिले व तेच पुढचे मुख्यमंत्री असे मुंबईत येऊन जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हा आता केवळ औपचारिकपणाच उरला. लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय? असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.
सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 ला संपेल. त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री, नवे राज्य मिळेल. निवडणुका एकाच टप्प्यात होत आहेत हे महत्त्वाचे. मतदारांच्या मनात काय आहे व राज्याचे निकाल काय लागतील हे सांगायला आता भविष्यवाल्या पोपटरावांची गरज नाही.
- लोकसभा निवडणुकांतील निकालांपेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. नवे राज्य, नवे मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरनंतर सूत्रे हाती घेतील, पण तो नवा मुख्यमंत्री मीच असेन, दुसरा कोणीही नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे जाहीर केले आहे. याचा अर्थ त्यांनी हायकमांडशी यावर चर्चा केली आहे व तसा शब्द घेतला आहे.
- याआधी चंद्रकांत पाटलांचे असे म्हणणे होते की, निवडून आलेले आमदार नेता निवडतील व दिल्लीश्वरांच्या आदेशाने जे व्हायचे ते होईल. ते आता होणार नाही. महाराष्ट्रात यावेळी पाऊस चांगला झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कुठे पूर तर कुठे होरपळ आहे, पण चंद्रकांत पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत.
- महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता. ही ऊर्जा, हा आत्मविश्वास ज्यांच्यापाशी आहे त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग सुकरच होत असतो. भाजपकडे हा आत्मविश्वास आहे असेच एकंदरीत वातावरण दिसते. त्याचा आम्हाला आनंदच आहे.
- महाराष्ट्रात विरोधी पक्ष आधीच गर्भगळीत होऊन पडले आहेत. काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादीतील दिग्गज नेते, विद्यमान आमदारांनी भाजपात व शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अतिदक्षता विभागात आहे तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे. शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालीत आहेत, पण उपयोग काय? त्यांची तडफ वाखाणण्यासारखी आहे इतकेच.
- मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच ‘पर्व’ असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व ‘माजी’ ठरतात.
- निवडणुका लढण्यासाठी सुसज्ज कार्यकर्त्यांची जी फळी लागते ती आज काँग्रेस पक्षाजवळ शिल्लक आहे काय? मुळात लोकांच्या भावना वेगळ्या व काँग्रेस पक्षाचे धोरण त्याविरोधात असे सुरू आहे. 370 कलमाच्या बाबतीत काँग्रेसने लोकविरोधी भूमिका घेऊन आपले उरलेसुरले अस्तित्व संपवून टाकले.