मुंबई- भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत भाजपाने विद्यमान 12 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले असून, 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पहिल्या यादीत समावेश नाही. भाजपनं प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचं नाव नाही. दुसऱ्या यादीत त्यांना स्थान दिलं जाणार की त्यांचं तिकीट कापण्यात येणार, अशी चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खडसेंवर आरोप झाल्यानं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षापासूनदेखील दूर गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खडसे म्हणाले, मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. यादीत नाव आहे की नाही माहीत नाही. मला अपेक्षा आहे, 42 वर्षं मी या मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करतोय. बऱ्याचदा पक्ष सोडण्यासाठी दबाव आला, पण मी भाजपापासून दूर गेलो नाही. पक्षाशी प्रामाणिक राहणं हा गुन्हा असल्यास तो मी केलाय. 25 वर्षं मुंडे, महाजन आणि मी मिळून सामूहिक निर्णय घ्यायचो, तेव्हा तिकीट वाटपातही मी असायचो, भाजपानं दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडत आलेलो आहे, शेवटी काय कालाय तस्मै नम:, असंही खडसे म्हणाले आहेत.
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचीही स्थिती खडसेंसारखीच आहे. 2014मध्ये मेहता घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आले. मात्र पहिल्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपच्या पहिल्या यादीत घाटकोपर पूर्व मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत तरी त्यांना स्थान मिळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. तावडे 2014मध्ये बोरिवलीतून निवडून आले होते. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत बोरिवलीचा समावेश नाही. याशिवाय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. ते 2004, 2009 आणि 2014मध्ये चंद्रपूरमधील कामठी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांच्या मतदारसंघाचा पहिल्या यादीत समावेश नाही. याशिवाय पहिल्या यादीत वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित, मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचाही समावेश नाही.