Vidhan Sabha 2019: निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:59 PM2019-09-21T23:59:22+5:302019-09-22T00:00:14+5:30

निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली असून उमेदवारीची माळ आपल्या गळयात पडणार की नाही याची काळजी इच्छुकांना लागून राहिली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 As the elections were announced, the fear of aspirants increased | Vidhan Sabha 2019: निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली

Vidhan Sabha 2019: निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली

Next

मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्याने राज्यातील निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली असून उमेदवारीची माळ आपल्या गळयात पडणार की नाही याची काळजी इच्छुकांना लागून राहिली आहे. काही किरकोळ अपवाद वगळता उमेदवार याद्या जाहीर झालेल्या नसल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकतेचे वातावरण आहे. जाहीर प्रचारापूर्वी करावयाच्या पूर्वतयारीला वेग आल्याचे चित्र आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने शनिवार पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी कसे वागावे याचे धडे देण्यात आले आहेत. कोणत्या इच्छुकाला उमेदवारी मिळणार याबाबत अनिश्चितता असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुक वरिष्ठ नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत. मात्र नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याची खात्री नसल्याने सर्वच इच्छुक तणावात आहेत. दुसरीकडे, कार्यकर्त्यांमध्ये देखील उमेदवारीबाबत उत्सुकता दिसून येत आहे. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही तर उमेदवारी मिळालेल्या नेत्यासोबत लगेच जवळचे संबंध तयार करण्यासाठी काही हुशार कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावून ठेवली आहे.

निवडणूक कालावधीत कार्यकर्त्याचा भाव वधारलेला असल्याने या काळात आपले महत्त्व वाढवून त्याची पुरेपूर किंमत वसूल करावी अशा मताचे देखील काही कार्यकर्ते असून त्यांना उमेदवार कोण आहे याबाबत काहीही स्वारस्य नाही.

युतीबाबतची अनिश्चितता
१. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होण्याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने दोन्ही पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते युतीबाबतच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. युती झाली नाही तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे.
२. विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी आपापल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत राजकीय पक्षांच्या कार्यालयात, इच्छुकांसमोर आपली शक्ती दाखवण्यात व्यस्त आहेत. विविध पक्षांनी बुथ पातळीवरील प्रमुखांच्या बैठका आयोजित केल्या असून विधानसभा मतदारसंघ निहाय शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत.
३. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रक्रियेमध्ये रंग भरण्याची चिन्हे असून त्यानंतर प्रचाराला वेग येईल. काही ठिकाणी उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास असलेल्या इच्छुकांनी मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. तर, दिवाळी पूर्वी निवडणुकीच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्याचा कार्यकर्त्यांचा मूड दिसत आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 As the elections were announced, the fear of aspirants increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.