Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली?

By बाळकृष्ण परब | Published: October 2, 2019 02:55 PM2019-10-02T14:55:20+5:302019-10-02T14:56:02+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: युती होण्यास कारणीभूत ठरलेला अजून एक घटक म्हणजे विश्वासार्हता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचे वितुष्ट आले होते.

Maharashtra Vidhan Sabha 2019: the fact that there is no 'fifty-fifty'; But did the Shiv Sena win or Lost? | Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली?

Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली?

Next

बाळकृष्ण परब

हो, नाही, नाही हो करता करता अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ यावर दीर्घकाळ काथ्याकूट केल्यानंतर अखेरीस सध्या भाजपाच मोठा भाऊ असल्याचे मान्य करत शिवसेनेने मिळालेल्या जागांवर समाधान मानले. तसा जागावाटपाचा तिढा लांबला असला तरी या निवडणुकीसाठी युती होईल, अशी शक्यता राजकारणातील जाणकारांकडून व्यक्त होत होतीच. मात्र समान जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेने अखेरीस कमी जागांवर तडजोड केल्याने शिवसेना झुकली का? आता भाजपाच युतीमध्ये मोठा भाऊ बनलाय का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी काही कारणांमुळे युती करणे ही या दोन्ही पक्षांची गरज होती. त्यामुळेच एकमेकांच्या बाबतीत 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय,' अशी परिस्थिती असतानाही भाजपा आणि शिवसेना युतीचे कुंकू एकमेकांच्या माथी लावण्यास राजी झाले.

लोकसभा निवडणुकीनंतर  आलेले कमालीचे नैराश्य तसेच अनेक नेते पक्षांतर करून भाजपा आणि शिवसेनेच्या आश्रयास जात असल्याने कांँग्रेस आणि राष्ट्रवादी हे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष गलितगात्र झाले आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे लढले असते तरी निकालांनंतर किमान बहुमत मिळवण्याइतपत जागा भाजपा आणि शिवसेनेला नक्कीच मिळाल्या असत्या. पण अशा परिस्थितीत एकत्र लढत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नव्याने संजीवनी मिळाली असती. कारण नेते सोडून गेले असले तरी या दोन्ही पक्षांचा जनाधार अजून कमकुवत झालेला नाही. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीला पुनरागमनाची कोणतीही संधी शिल्लक राहू नये यासाठी भाजपा आणि शिवसेनेने काही तडजोडी करत का होईना युतीची तयारी केली. 

Image result for aaditya thackeray and amit shah
Image result for aaditya thackeray and amit shah

युती होण्यास कारणीभूत ठरलेला अजून एक घटक म्हणजे विश्वासार्हता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचे वितुष्ट आले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांचा शेलक्या शब्दात उद्धार सुरू होता. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपाने हातापाया पडून शिवसेनेला युतीस राजी केले होते. तसेच विधानसभेसाठीही युती करण्याचे वचन दिले होते. मात्र लोकसभेत बंपर यश मिळाल्यापासून भाजपा 2014 प्रमाणेच ऐनवेळी युती तोडणार अशा वावड्या उठण्यास सुरुवात झाली होती. त्यातच भाजपाचे काही नेतेसुद्धा युतीसाठी मनापासून तयार नव्हते. पण सतत युती तुटीचे राजकारण करत राहिल्यास चुकीचा राजकीय संदेश गेला असता. तसेच शिवसेनेला युतीबाबत दिलेला शब्द मोडला असता तर भाजपाच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्यामुळे यावेळी युती तोडण्याबाबत भाजपातील वरिष्ठ मंडळी फारशी इच्छुक नव्हती. त्यामुळेच यावेळी भाजपाकडून युतीबाबत लवचिक भूमिका घेतली गेली. तसेच शिवसेनेनेही तडजोडीबाबत आवश्यक तो समजूतदारपणा दाखवला. त्यामुळे अखेरीस युतीवर शिक्कामोर्तब झाले.

Image result for aaditya thackeray and amit shah

आता युतीचे घोडे गंगेत न्हाल्यानंतर या युतीचा नेमका फायदा कुणाला झाला. आता जागावाटपात शिवसेना झुकली की भाजपाने उदारता दाखवली, याची चर्चा सुरू झाली आहे. या युतीचे संभाव्य परिणाम आणि युतीचा विधानसभा निवडणुकीवर पडणारा प्रभाव याचीही चर्चा सुरू झाली आहे. आता जागावाटपाकडे पाहिल्यास भाजपा आणि शिवसेनेने बऱ्यापैकी समजुतदारपणा दाखवल्याचे दिसून येतेय. 2014 च्या विधानसभेत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तसेच काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता. तसेच इनकमिंगनंतर भाजपाचे संख्याबळ वाढले आहे.  अशा परिस्थितीतही भाजपाने स्वतःसाठी 146 आणि मित्रपक्षांच्या 18 अशा 164 जागा घेतल्या. दुसरीकडे केवळ 63 आमदार असलेल्या शिवसेनेच्या पदरात 124 जागा पडल्या आहेत. जवळपास दुप्पट जागा शिवसेनेला मिळाल्यात. त्यामुळे जागावाटपात शिवसेना झुकली असं म्हणणे सध्यातरी चुकीचे ठरेल. एकंदरीत चित्र पाहता युतीचा बऱ्यापैकी फायदा भाजपा आणि शिवसेनेला होईल, असे सध्यातरी दिसतेय. त्यातही एकंदरीत जागावाटप पाहत युतीचा लाभ शिवसेनेलाच अधिक होण्याची शक्यता आहे.

Related image

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: the fact that there is no 'fifty-fifty'; But did the Shiv Sena win or Lost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.