Join us

Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:12 AM

अनेक उमेदवार रांगेत; भाजपला टक्कर देण्यासाठी चाचपणी

- शेफाली परब-पंंडित मुंबई : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या सायन कोळीवाडा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ खुलले. या मतदारसंघात ‘हात’ पुन्हा बळकट होण्यासाठी काँग्रेसला तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावा लागणार आहे. परंतु, आमदारकीचे तिकीट आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी या मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे.सायन कोळीवाडा हा बहुभाषिक मतदारसंघ आहे. दक्षिण भारतीय मतदार येथे सर्वाधिक आहेत. म्हणूनच काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी २००४ आणि २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. काँग्रेसचा हा गड भेदण्यासाठी भाजपने पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक कॅप्टन तमीळ सेल्वन यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दावेदार अधिक असल्याने अंतर्गत वाद उफाळून येण्याचा धोका काँग्रेसला या ठिकाणी संभवतो.तिकीटवाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू असल्या तरी या मतदारसंघात काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. यामध्ये महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव आणि मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष कचरू यादव हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. रवी राजा आतापर्यंत पाचवेळा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. महापालिकेत ते विरोधी पक्षनेते पदावर आहेत. तर कचरू यादव हे काँग्रेसच्या माजी नगरसेविका ललिता यादव यांचे पती आहेत.या शर्यतीत युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव पुढे असल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु, पक्षात गेली २५ वर्षे निष्ठेने कार्य करणारे रवी राजा यांची यापूर्वीही बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे या वेळेस उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. तर कचरू यादव हे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या मर्जीतले असल्याचे समजते. उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याविषयी उत्सुकता वाढली आहे.एकूण मतदार -दोन लाख ५४ हजार ९१०पुरुष - एक लाख ४३ हजार ८४९स्त्री - एक लाख ११ हजार आठ

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाकाँग्रेस