भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:39 PM2019-09-26T12:39:50+5:302019-09-26T13:06:05+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरु आहे.
मुंबई - विधानसभा निवडणूक जाहीर झाली असताना राज्यातील राजकारणाला वेग आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून प्रचारात रंगत आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त करत विधानसभा निवडणूक लढवावी की नाही अशा संभ्रमात असणाऱ्या राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे जवळपास 100 ते 120 जागा लढविणार असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या मनसेचा प्रभाव असणाऱ्या भागामध्ये मनसे संपूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. या विभागातील सर्व जागा मनसेने लढविण्याचा निर्णय केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ, कोकण याठिकाणच्या मोजक्या जागांवर मनसे लक्ष केंद्रीत करणार आहे. मनसेच्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सध्या सुरु आहे अशातच काही शिवसेना-भाजपातील इच्छुकांनी मनसेशी संपर्क साधला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाची अंतिम चर्चा सुरु आहे. मात्र अद्यापही काही जागांवर दोन्ही पक्षाचं एकमत होताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे युतीबाबत सकारात्मक आहे. 100 टक्के युती होणारच असा दावा भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे.
मात्र शिवसेना-भाजपा युती झाली तर बंडखोरीचा फटका बसू शकतो यासाठी भाजपा-शिवसेनेकडून युतीबाबत अधिकृत घोषणा होण्यास टाळाटाळ होत आहे. साधारणपणे 29 सप्टेंबरपर्यंत युतीचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती आहे. युती झाली तर शिवसेना-भाजपातील अनेक इच्छुक मनसेच्या इंजिनावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक उमेदवार मतदारसंघ बांधत आहेत. त्यामुळे युती झाल्यावर आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने या दोन्ही पक्षातील इच्छुक मनसेच्या नेत्यांना फोन करुन संपर्क साधत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेदेखील महत्वाची भूमिका बजाविण्यासाठी रणांगणात उतरली आहे.