Vidhan Sabha 2019: मुलुंडमध्ये ५ हजारांवर नवमतदारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:39 PM2019-09-23T23:39:33+5:302019-09-23T23:39:43+5:30

वाढीव टप्पा कोणाच्या पारड्यात; तरुणांची संख्या अधिक, बॅनर्स हटवले

Maharashtra Vidhan Sabha 2019 Mulund reports over 5,000 newcomers | Vidhan Sabha 2019: मुलुंडमध्ये ५ हजारांवर नवमतदारांची नोंद

Vidhan Sabha 2019: मुलुंडमध्ये ५ हजारांवर नवमतदारांची नोंद

Next

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुलुंड विधानसभामध्ये ५ हजार ४०० नवमतदारांची नोंद झाली आहे, यात तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा वाढलेल्या टक्का कुणाच्या पारड्यात जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती या मतदार संघामध्ये दिसून येते. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे.

मुलुंड विधानसभेमध्ये एकूण २ लाख ८६ हजार ५४५ मतदार आहेत. यात, १ लाख ३८ हजार ५०४ महिला तर १ लाख ४८ हजार २० पुरुष आणि २१ इतर मतदारांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ४ हजार नवमतदारांचा समावेश होता. त्यात विधानसभेला जून महिन्यापासून यात ५ हजार नवमतदारांचा समावेश झाला आहे. या मतदारसंघात १९९९ पासून भाजपचे आमदार म्हणून सरदार तारासिंग कार्यरत आहेत, तर पालिका निवडणुकीत भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेविकेचे जात प्रमाणपत्रातील त्रुटीमुळे पद रद्द करण्यात आले होते. त्या जागी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळाली. यंदाही मुलुंडमधून आमदारकीसाठी भाजपचा चेहरा कोण असेल? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

मुलुंडमध्ये एकूण ३०० मतदान केंद्रे आहेत. त्यात गोशाळ रोड येथे एकूण १९ मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार, मुलुंड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना जगताप भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य असे नियोजन करण्यात आले आहेत. यात टी वॉर्डचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांच्याकडे आचारसंहिता पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमधील विविध रस्ते, सोसायट्यांभोवती लावण्यात आलेले बॅनर्स, पोस्टर्स तातडीने हटविण्यात आले.

मुलुंड विधानसभा अंतर्गत मुलुंड चेक नाका, ऐरोली टोल नाका आणि आनंदनगर टोल नाका या ३ प्रमुख टोल नाक्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील हालचालींवर लक्ष ठेवण्याचे विशेष आव्हान पोलीस, आचारसंहिता पथकासह विविध पथकांवर असते. त्या दृष्टीनेही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

इच्छुकांना मार्गदर्शन...
इच्छुक उमेदवारांनी आचारसंहितेचे उल्लंघन करू नये, यासाठी सोमवारी मुलुंड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना जगताप भोसले यांनी त्यांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांना आचारसंहितेच्या काळात काय करावे? आणि काय करू नये, याबाबत सांगितले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Mulund reports over 5,000 newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.