Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:55 AM2019-09-30T03:55:29+5:302019-09-30T03:55:47+5:30

राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

Maharashtra Vidhan sabha 2019: Mumbai suburbs top in transgender voter registration | Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

googlenewsNext

मुंबई : राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे. राज्यात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे. तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ६७ महिला मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार, ठाणे जिल्ह्यात ४६० आणि पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ आॅगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

माहिती मिळविण्याची दुसरी सुविधा...

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो.
माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा.
मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
यामध्ये राज्य, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदाराचे संपूर्ण नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मतदार ओळख क्रमांक, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदाता क्रमांक, मतदाराचे भाग क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आदी माहिती छापलेली आहे.
सध्याच्या विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात आली आहे.
ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.


मतदान व्हावे म्हणून...
जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात आले. जुलै-आॅगस्ट २०१९ या कालावधीत जनजागृती राबविण्यात आली.

मतदार जोडले
सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.

एका क्लिकवर मतदान केंद्र
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक
यांचा समावेश आहे.

ऑनलाइन मतदार माहिती
अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदार यादीतील क्रमांक शोधण्यात वेळ जातो. त्यामुळे मतदान स्लिप मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी आॅनलाइन मतदार माहिती मिळविण्याची सुविधा दिली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Mumbai suburbs top in transgender voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.