Join us

Vidhan sabha 2019 : माझे पाय कायम जमिनीवरच ! - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 6:09 AM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.आदित्य यांचा अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, मंत्री, आमदार, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसह भाजपचे मुंबईतील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आदित्य यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत चांगला समन्वय असल्याचे सूचक विधान केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी शिवसेनेने केली आहे. यासाठी वरळीतून ठिकठिकाणांहून पदयात्रा काढण्यात येतील. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्या विविध भाषेतील पोस्टर्स चर्चेचा विषय ठरत आहेत.दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. वरळी कोळीवाड्यातील छोट्यामोठ्या ४० नवरात्रौत्सव मंडळांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. आदित्य यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पाठविणार असल्याची भाषा शिवसेना नेत्यांनी केली होती. याबाबत माध्यमांनी विचारले असता, सहाव्या मजल्यावर जाणार की नाही हे माहीत नाही. पण, माझे पाय जमिनीवर आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने मोठी जबाबदारी आली आहे. शिवसैनिकांच्या पाठिंब्याने ती पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल विचारले असता, उमेदवार द्यायचा की नाही हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु विकासासाठी सर्वांनी सोबत यावे अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी सचिन अहिर, विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरे