Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:46 AM2019-09-21T04:46:29+5:302019-09-21T04:47:11+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पाकिस्तानसंदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप चुकीच्या माहितीवर आधारित

Maharashtra Vidhan Sabha 2019 - PM accused of misinformation; Pawar's special talk with 'Lokmat' | Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित

Vidhan Sabha 2019 :पंतप्रधानांचा आरोप चुकीच्या माहितीवर; पवार यांची ‘लोकमत’शी विशेष बातचित

Next

राजा माने 
मुंबई : पाकिस्तानसंदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यात कुठलेही तथ्य नाही. केवळ फडणवीसांच्या सांगण्यावरून मोदींनी तो आरोप केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान संदर्भातील वक्तव्यावरून शरद पवारांवर तोफ डागली. पवार यांच्यासारखा अनुभवी नेत्याने जेव्हा काश्मीरच्या प्रश्नी शेजारच्या राष्ट्राच्या शासन व प्रशासनाची स्तुती केली त्याचे आपल्याला दु:ख वाटले, अशा शब्दांत मोदींनी टीका केली होती. त्यावर पवार म्हणाले, मी पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेबद्दल नेमके काय बोललो, हेही त्यांना माहीत नाही. आमच्या राष्ट्रप्रेमाबद्दल त्यांनी बोलू नये. तमाम जनतेला ते माहीत आहे. केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि समाजात संभ्रम निर्माण करायचा, ही यांची नीती आहे.
राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याबाबत ते म्हणाले, राज हे चांगले वक्ते आणि संघटक आहेत. तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते आघाडीसोबत हवेत अशी आमची भूमिका होती. पण आमचा मित्रपक्षांच्या धोरणात ते बसत नाहीत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर राष्टÑवादीसोबत यायला तयार नाहीत. नेमकं तुमच्यात नक्की काय बिनसलंय? असे विचारले असता यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे पवारांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे जागा वाटप ठरले असून घटक पक्षांना किती जागा द्यायच्या हेही ठरले आहे. आमच्यात कसलेही मतभेद अथवा बिघाडी नाही. नाशिक दौऱ्यापासून मी पाहतोय, लोकांना परिवर्तन हवंय. त्यात तरुण आघाडीवर आहेत. तोच अनुभव मराठवाड्यात मला येतोय, असा दावाही पवारांनी केला.
अचंबित करणारा उत्साह
शरद पवारांनी सध्या झंझावाती दौरा काढला आहे. दररोज ते शेकडो कार्यकर्त्यांना भेटत आहेत. दररोज किमान ३-४ छोट्या-मोठया सभा, दररोज किमान दोनशे किमी प्रवास, रात्रीच्या जागरणानंतर आणि पहाटे उठून कार्यास सुरुवात करणे, असा वयाच्या ७९व्या वर्षीही पवारांचा दिनक्रम सुरू आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - PM accused of misinformation; Pawar's special talk with 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.