मुंबई - मागील 5 वर्ष राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता होती. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षात बसलेली शिवसेना अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्ताधारी पक्षात गेला. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली. मात्र भाजपासोबत सत्तेत जाऊन आम्ही चूक केल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी हे विधान केलं आहे. यावेळी राऊत म्हणाले की, जागावाटपात दिरंगाई होऊ नये असं वाटते, यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक खोळंबले असतात. मात्र 288 जागांचा निर्णय करताना सगळा विचार करावा लागतो असं ते म्हणाले त्याचसोबत 2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं असा दावा संजय राऊतांनी केला.
तसेच विरोधी पक्षाला अनेक फायदा असतो. 5 वर्ष संघर्ष करुन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर त्याचा फायदा पक्षाला झाला असता. लोकं पर्याय म्हणून प्रबळ विरोधी पक्षाला मतदान करतात. हा माझा अनुभव आहे असं सांगत अप्रत्यक्षरित्या भाजपासोबत सत्तेत गेल्याचा पश्चाताप झाल्याची भावना संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन दिसून आली.
गेली 4 वर्ष शिवसेना-भाजपात सत्तेत एकत्र राहूनही अनेक संघर्ष पाहायला मिळाले. अनेक मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही 25 वर्ष युतीत सडलो अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका करत शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी मागण्याचं काम शिवसेना करते अशी जहरी टीका केली. महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले असले तरी राज्य सरकारमध्ये शिवसेना-भाजपा एकत्र होती. अनेकदा शिवसेना मंत्र्यांनी खिशात राजीनामे असल्याची भाषा वापरली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत निवडणुकीला सामोरे गेले.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली. लोकसभा निवडणुकीच्या चर्चेवेळी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला आहे असं शिवसेनेचे नेते म्हणत असले तरी आताची परिस्थिती वेगळी आहे असं सांगत भाजपाने शिवसेनेला जास्त जागा सोडण्यास तयारी दाखविली नाही. त्यामुळे युतीचं घोडं जागावाटपात अडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर?; पंतप्रधान मोदींनी मानले ट्विटवरुन आभार
'या' 12 जागांसाठी युतीची लढाई, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आग्रही