Join us

Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:35 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा काही दिवसात होईल. मात्र युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर गुरुवारी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई मॅरेथॉन बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवसेना 126 तर भाजपा 162 जागांवर निवडणुका लढणार आहे. 

शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविली आहे. मात्र तत्पूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये शिवसेना सचिव अनिल देसाई म्हणाले की, निवडणुकीपूर्वीची आढावा बैठक आहे ज्यात पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. युतीबाबत नवीन फॉर्म्युला आला आहे तुम्ही आकड्यांमध्ये जाऊ नका, जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढायची आमची तयारी आहे. समाधानी असल्याशिवाय पक्षप्रमुख तसं काही करणार नाहीत असं देसाई यांनी सांगितलं. 

तसेच युतीची घोषणा २२ तारखेला किंवा त्याच्याही आधी होईल असंही अनिल देसाई यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर जोर देत होती. शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले होते की, भाजपाने 50-50 जागावाटपाचं सन्मान करायला हवा. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे भाजपाने त्याचा सन्मान करणं गरजेचे आहे. 

गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल. कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला होता.मात्र वरिष्ठांच्या आदेशामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाने शिवसेनेला काही जागा वाढवून देण्यासाठी सहमती दिली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 22 सप्टेंबर रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांची युती अधिकृतरित्या जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे.  

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019