मुंबई : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नाममात्र उरले आहे. दादर, माहिम या पट्ट्यातील बहुतांशी मराठी मतांची विभागणी होत असल्याने काँग्रेसला येथे संधी होती. विरोधी पक्षात असूनही या मतदारसंघात ‘हात’ स्थानिक पातळीवर मजबूत झाला नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे प्रयोगच करावे लागले आहेत. या वेळेसही उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे.१९६२ पासून असलेल्या दादर विधानसभेचे २००८ मध्ये माहिम विधानसभेत रूपांतर झाले. त्यापूर्वी काँग्रेसचा उमेदवारच येथे निवडून येत होता. १९९० मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी दादर विधानसभेतून निवडून आले. त्यानंतर काँग्रेसची या मतदारसंघातून पिछेहाट होत गेली. दादर विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला.काँग्रेसला पुन्हा कधी या मतदारसंघात संधी मिळाली नाही. माहिम विधानसभेत विलीन झालेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये मनसेचे इंजीन धावले. मराठी मतांची येथे मोठ्या प्रमाणात विभागणी झाली. शिवसेना आणि मनसेच्या भांडणातही काँग्रेसला येथे संधी साधता आली नाही.या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एखाद-दुसरा नगरसेवक निवडून आला आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढविण्यात यश न आल्यामुळे काँग्रेसला येथे नवीन चेहऱ्याचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागले. २००९ मध्ये शिवसेनेने आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे बंडखोरी करणारे सदा सरवणकर यांना काँग्रेसने तिकीट दिले. मनसेने यात बाजी मारली आणि सरवणकरांचा पराभव झाला. २०१४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक यांना अवघी ११ हजार मते मिळाली होती.या मतदारसंघात काँग्रेसच्या गोटात फारशी उत्सुकता दिसून येत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ आला तरी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अस्पष्टताच आहे. याबाबत विचारले असता, माहिममध्ये काँग्रेसचा जनसंपर्क कमी पडत आहे. त्यामुळे तेथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही, स्थानिक पातळीवरील इच्छुक नेत्याला संधी मिळेल, असे काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.२00९नितीन सरदेसाई (मनसे) - ४८७३४सदा सरवणकर (काँग्रेस) - ३९८0८आदेश बांदेकर(शिवसेना) - ३६३६४२0१४सदा सरवणकर (सेना) - ४६२९१नितीन सरदेसाई (मनसे) - ४0३५0विलास आंबेकर - (भाजप) - ३३४४६२0१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला माहिम मतदारसंघातून ९१ हजार ९३५ मते मिळाली होती.काँग्रेसला ३८ हजार १४५ मते मिळाली आहेत.
Vidhan Sabha 2019: माहिममध्ये काँग्रेसची योग्य उमेदवारासाठी शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 1:06 AM