मनोहर कुंभेजकर
मुंबई - एकीकडे भाजप व शिवसेना युतीबाबत उलट सुलट चर्चा असताना युती होऊ नये म्हणून विरोधी पक्ष देव पाण्यात घालून बसले आहेत. मात्र 1001 टक्के सन्मानाने युती होणार असून घटस्थापनेच्या दिवशी युतीचे घट बसणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील अशी खात्रीलायक माहिती आहे. 2014 रोजी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी युती तुटली होती. भाजपा व शिवसेना वेगळे लढले होते. मात्र आता याची पुनरावृत्ती होणार नसून युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदारांचे व शिवसैनिकांनाचे देखील युती झाली पाहिजे असे मत असून याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती बाबत अंतिम निर्णय घेतील असे मत सूत्रांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात युतीबाबत चर्चा झाली असून फॉर्म्युला ठरला आहे. मात्र भाजपा व शिवसेनेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसमधून आलेल्या मातब्बर नेत्यांना तिकीट वाटपात कसे सामावून घ्यायचे यावर चर्चा सुरू असल्याचे समजते.
युती होणार यात शंकाच नाही आणि 24 ऑक्टोबरला निकाल लागल्यावर युती 220 चा आकडा पार करत 240 चा टप्पा गाठणार असून दिवाळीपूर्वी युतीच्या विजयाचे फटाके फुटतील असा ठाम विश्वास सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना आपल्या जवळजवळ सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असून फक्त वरळी विधानसभा मतदार संघात बदल होणार आहे. युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे येथून निवडणूक लढवणार यात दुमत नसल्याचे समजते.
लोकसभेसाठी युती होणार याचा कोणाला व प्रसिद्धी माध्यमांना थांगपत्ता नव्हता.17 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मातोश्रीत येणार असून लोकसभा निवडणूकीसाठी युतीची घोषणा होणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त लोकमतनेच दिले होते.