Join us

Vidhan Sabha 2019: वरळी विधानसभेतून लढणार आदित्य ठाकरे; विद्यमान आमदार सुनील शिंदेंचा पत्ता कट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 7:09 PM

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केले आहेत. सगळ्यांची उत्सुकता लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अधिकृतरित्या आदित्यच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केलं आहे. 

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर हळूहळू विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढून राज्यभर प्रचाराचा शुभारंभ केला. येत्या २ किंवा ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरतील असं सांगण्यात येत आहे.शिवसेनेची पहिली यादी उद्धव ठाकरे अधिकृतरित्या घोषित करतील. मात्र विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप करुन शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

घटस्थापनेचा मुहुर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कागलमधून संजय बाबा घाडगे, चंदगडवरुन संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

कोल्हापुरात एकूण 10 जागा आहेत. त्यातील सहा शिवसेनेकडे, 2 राष्ट्रवादी, 2 भाजपाकडे आहे. तसेच कोल्हापूरसह रत्नागिरी - दापोली मतदार संघात शिवसेनेकडून योगेश रामदास कदम यांना उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना रामदास कदम यांचा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 144 जागा, मित्रपक्ष 18 तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावर सहमत न झाल्याने दोन्ही पक्षाची 25 वर्षाची युती तुटली होती. 

टॅग्स :आदित्य ठाकरेवरलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019