श्रीवर्धनमधून विनोद घोसाळकरांना शिवसेनेचं तिकीट; पक्षांतर करणाऱ्या अवधूत तटकरेंना डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:48 PM2019-10-01T15:48:20+5:302019-10-01T15:51:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी विनोद घोसाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी हातावर शिवबंधन बांधलं होतं. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत पाहायला मिळेल असं बोललं जात होतं. पण श्रीवर्धनमधून शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अवधूत तटकरे अवघ्या 77 मतांनी याठिकाणाहून निवडून आले होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सुनील तटकरे यांना 37 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तसेच मागील काही वर्षापासून आदिती यांनी या मतदारसंघात चांगला जनसंपर्क ठेवला आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात विनोद घोसाळकर विरुद्ध आदिती तटकरे असा सामना रंगणार आहे.
भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट
विनोद घोसाळकर यांचा शिवसेना शाखाप्रमुख ते म्हाडा सभापती राज्यमंत्री दर्जा असा चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास राहिला आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून त्यांना श्रीवर्धनची उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात 35 वर्ष विभाग प्रमुख या नात्याने घोसाळकर यांनी काम केलं. दहिसर विधानसभेत ते आमदार म्हणून होते. मात्र यंदा ही जागा युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेली आहे. या जागेवर विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अवधूत तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने याठिकाणी अवधूत ऐवजी विनोद घोसाळकरांना तिकीट दिल्याने श्रीवर्धन मतदारसंघात बाजी कोण मारणार हे पाहणे गरजेचे आहे.
भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी