Vidhan Sabha 2019: शिवसेना कापणार काही विद्यमान आमदारांचे तिकीट, कोअर कमिटीकडून नावे निश्चित?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:10 AM2019-09-17T11:10:18+5:302019-09-17T11:45:24+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विरोधी पक्षांमधून पक्षात जोरदार इनकमिंग होत असल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र ...
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधी पक्षांमधून पक्षात जोरदार इनकमिंग होत असल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आगामी निवडणुकीत काही विद्यामान आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. तिकीट कापण्यात येणाऱ्या आमदारांची नावे कोअर कमिटीकडून निश्चित झाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांची धडधड वाढली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 63 आमदार विजयी झाले होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी काही आमदारांची कामगिरी अपेक्षेनुरूप राहिलेली नाही. त्यातील काही जणांना लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी चांगल्या प्रकारे काम करता आलेले नाही. काही जणांविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत. तसेच काही जणांना लोकोपयोगी कामांमध्ये भरीव योगदान देता आलेले नाही.
दरम्यान कोअर कमिटीने काही अकार्यक्षम आमदारांची नावे निश्चित केली आहे. त्यानुसार शिवसेनेकडून एकूण पाच ते दहा आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. मात्र तिकीट कापले जाणारे आमदार कोण याची माहिती मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.